हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील दोन वर्षात सरकार पाडू न शकलेला विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद म्हणावा लागेल. तारखा बदलण्याच्या फंदात आणि छंदातुन अजूनही भाजप बाहेर आलेला नाही. ठाकरी बाण्याने विरोधी पक्ष दिशाहीन झालाय असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर टीकेचे बाण सोडलेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरका आता लवकरचं पडेल असं म्हटलंय. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे असा सवाल राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला.
ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत नेमके काय केले ते मी नंतर लिहीन, पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांत ते प्रिय आहेत. हा माणूस कारस्थानी नाही ही त्यांची ओळख बनली आहे. श्री. शरद पवार यांनी ठाकरे यांना काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे व सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही हस्तक्षेप नाही. कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा राष्ट्रीय पातळीवरही सगळ्यांत आश्वासक चेहरा होता. हाच माणूस संकटातून रक्षण करेल हा विश्वास त्यांनी निर्माण केला. त्यांनी भव्य आरोग्य यंत्रणा उभी केली. लोकांना फॅमिली डॉक्टरप्रमाणे मार्गदर्शन केले. टीकेची पर्वा केली नाही. प्रसंगी कठोर वागले.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले. आजही महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य गणले जाते. याचे कारण इथे आजवर राजकीय स्थैर्य नांदत आले आहे. इथल्या कामगारांची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत वरच्या दर्जाची आहे. जनताही तुलनेत सुशिक्षित व आधुनिक विचारांचा स्वीकार करणारी आहे. इथली शासकीय यंत्रणा कार्यक्षम आहे आणि तिचा दृष्टिकोन आधुनिक व विकासोन्मुख आहे. ही सर्व व्यवस्था सरकारे आली व गेली तरी कायम असते. ती तशीच राहायला हवी. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हे सर्व मोडून पडेल असे वागणे सोडायला हवे. फडणवीसांचे पहाटेचे राजकारण 72 तासांत आटोपले. त्यास दोन वर्षे झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सोहळय़ाला दोन वर्षे होत आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.