मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. अशातच राज्यातील राजकारण पुन्हा फिरणार असल्याचं संकेत वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेतली. फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळं राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. ही गुप्त भेट होती असं म्हटलं जातं आहे. या भेटीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेलो नाही तर मनानेही वेगळे झालो आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असं वाटत नाही असं सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सदर बैठक झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. याशिवाय भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हे वाटणार नाही. शिवसेनेबाबत जाऊन सत्ता आणावी असं आम्हाला वाटत नाही असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळं शिवसेना- भाजपमधले बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होत असल्याची चर्चा आहे. तसंच, विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
गेल्या काही काळांत भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडीला अनेक मुद्द्यावरून घेरलं होतं. करोनाची राज्यातील स्थिती, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष असो अशा विविध मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. या आरोप- प्रत्यारोपांमुळं एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये कटुता निर्माण झाली होती. हीच कटुता दूर करण्यासाठी ही भेट असल्याचं, सूत्रांकडून कळतंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल आला खरंतर महायुतीच्या बाजूने आला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगला आणि शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. तसंच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात विस्तव जात नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेली भेट ही सूचक मानली जाते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.