मुंबई । ‘राजस्थानप्रमाणे इथेही कोणतंच ऑपरेशन यशस्वी होणार नाही. एखाद्या प्रकरणामुळे सरकार अस्थिर व्हायला लागले तर सर्वात आधी केंद्रातील सरकार पडेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचं,” संजय राऊत यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा पुन्हा एकदा त्यांनी आरोप केला. सुशांत सिंहच्या वडिलांच्या दोन लग्नावरुन केलेल्या वक्तव्यावर कुटुंबाने माफी मागण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सागितलं की, “कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही. जर चूक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत आहे”. संजय राऊत यांनी राजस्थानमधील राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या ऑक्टोबरपर्यंतच सरकार टिकणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना प्रयत्न करु राहू देत असं संजय राऊत यांनी म्हटलं.
सुशांत प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये. काही लोक सरकार पडण्याच्या डेडलाइन देत आहेत. त्याला आत्मानंद म्हणतात, अशी टीका करतानाच महाराष्ट्रा पुढे अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर सहकारी प्रयत्नांची शर्थ करत असून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत आहेत. कुणाला सरकार पाडणं किंवा अस्थिर करण्याच्या खेळात इंट्रेस्ट असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर जरूर पोळ्या शेकाव्यात. आम्हाला त्यात इंट्रेस्ट नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. हे महाराष्ट्र आहे. त्यामुळे राजस्थानप्रमाणे इथेही कोणतंच ऑपरेशन यशस्वी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव सीबीआयने घेतल्याचं माहीत नसल्याचंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”