Saturday, March 25, 2023

शिवसेनेला ‘बाबर सेना’ म्हणणाऱ्या कंगनावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले,बाबरी पाडणारे आम्हीच आहोत

- Advertisement -

मुंबई । आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामावर मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कंगनानं केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, “बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगना रणौतशी माझं वैर नाहीये. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती कदापि सहन करण्यासारखी नाही. कंगनानं जर आपलं म्हणणं मागे घेतलं, तर वाद राहणारच नाही.”

कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर कंगनानं मुंबई महापालिकेवर टीका केली. तिच्या टीकेला खासदार संजय राऊत म्हणाले कि, “करण्यात आलेल्या कारवाईचं उत्तर फक्त महापालिका आयुक्तच देऊ शकतात. जर कुणी कायदा तोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही. शरद पवार यांनी काय म्हटलं आहे, याबद्दल मला माहिती नाहीये. माझ्यासाठी अभिनेत्रीसोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझं बोलणं बरोबर नाही,” असं राऊत म्हणाले. “महापालिकेनं केलेली कारवाईचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे महापालिका न्यायालयात उत्तर देईल. कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही. मुंबईत देशभरातून आलेले लोक राहतात,” असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.