मुंबई । हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस खासदार यांना राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. यानंतर देशभरात काँग्रेस आणि सहयोगी पक्षांकडून या घटनेचा निषेध होत आहे. दरम्यान, राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.
राऊत यांनी म्हटलं की, मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं, असं संजय राऊतांनी म्हटलं. हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला ‘बेटी बचाओ’ ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.
राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की
हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल आणि प्रियांका यांना अटक केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.