व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातुन भाजपवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे. तसेच विरोधी पक्षांने ताळतंत्र सोडलं आहे असं म्हणत भाजपवर घणाघात केला.

सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा केली आहे. किरीट सोमय्या रोज सकाळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करतात. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे”, असं म्हणत राऊतांनी मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, गोपीनाथ मुंडे यांची उदाहरणं दिली. “आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते!” असा टोला राऊतांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार? पण पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? ‘ईडी’च्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते, असे राऊत यांनी म्हटले आहे.