हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा हे कृषी कायदे लागू करण्याची विनंती करेन अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधताना त्यांची मानसिकता तपासावी लागेल असा टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, मी आता चंद्रकांत पाटलांना शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.
कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.” असे देखील संजय राऊत म्हणाले होते.