हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यातच ईडी’शी लढताना मुश्रीफांच्या तोंडाला फेस येईल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पाटलांचा समाचार घेतला आहे.
‘ईडी’ शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता . ‘ईडी’ मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे . भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत, असे म्हणत शिवसेनेनं किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेनं घेत नसल्याचं म्हटलं आहे.
प्रश्न हा चंद्रकांतदादांच्या धमकीचा नसून तो केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे. ‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ”आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,” अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ”केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु” ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही असेही शिवसेनेने म्हंटल.