गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. गंगा नदीतील तरंगणाऱ्या मृतदेहावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या सत्य स्वीकारा!,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती आखताना दिसत होते. अमेरिका मासमुक्त झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळवला व मोठी आर्थिक झेप घेतली. मात्र, आम्ही कोरोना काळात निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

करोनाचे संकट कायम असताना महाराष्ट्रावर चक्रीवादळाने हल्ला केला. त्या पडझडीत मोठे नुकसान झाले. अशा वेळी राजकारण थोडे बाजूला ठेवून देशासाठी व राज्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पण प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे.

महाराष्ट्रातील भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला ४०० जागा मिळतील. यावर निखिल वागळे यांनी त्यांना चांगले उत्तर दिले आहे. आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू! लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत.

भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना विचारले, ‘साध्वीजी, आपण करोनापासून कसा बचाव करीत आहात?’ यावर साध्वीजींनी सांगितले, ‘सोपे आहे. मी रोज गोमूत्र प्राशन करते. गोमूत्रामुळेच करोना माझ्यापर्यंत पोहोचला नाही!’ भारतातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो करोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता, तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला,” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment