हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे घडतंय ते विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वादावर थेट भाष्य करण्यात आलं आहे.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे जुनेजाणते व महत्त्वाचे नेते आहेत. थोरात हा महाराष्ट्र कॉंग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वाद-वादळांत श्री. थोरातांनी काँग्रेसला धरून ठेवले. अत्यंत संयमी व शांत असे त्यांचे नेतृत्व आहे, पण थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे कॉंग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोड फुटले. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे.
कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेबांची माघार; काँग्रेसला मोठा दिलासा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/0BL15vOOeo#Hellomaharashtra @INCMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 9, 2023
नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी अर्ज न भरता पुत्र सत्यजीत तांबे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांना कॉंग्रेस पक्षातून निलंबित केले गेले. सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते व थोरातांचे भाचे’ आहेत. तांबे थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांब प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व जेष्ठ असून अपमानित केल्याचा संताप असा संताप बाळासाहेब थोरातांचा आहे व त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाहीं राखायचा, तर कोणाचा राखायचा? असा सवाल शिवसेनेने केला.
भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व बनवलेले कार्यकर्ते उचलूनच स्वतच्या इमारतीचे इमले रचत आहे. नगर जिल्हयात त्यांनी आधी विखे-पाटलांना ‘मेकअप’ करून भाजपमध्ये आणले व आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे. त्यात बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळयाच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे असा सल्ला शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे.
बाळासाहेब थोरांताच्या धमन्यांत कॉंग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. कॉंग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते असेही शिवसेनेने म्हंटल. पटोले थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये अशी अपेक्षा सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.