मोदींविरोधात लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांच्या समोरच थेट काँग्रेस वर हल्ला करत युपीए वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या एकूण सर्व घडामोडींवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन रोखठोक मत व्यक्त केले आहे. काँग्रेस संपावी हे भाजपला वाटण ठीक आहे पण मोदींविरोधात लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे असं शिवसेनेनं म्हंटल.

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे.

ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.

काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही. त्यामुळेच भाजपची रणनीती काँग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीच रणनीती मोदी अथवा भाजपविरोधाच्या मशाली पेटवणाऱयांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे?

यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे ‘यूपीए’चे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. ‘यूपीए’ नसेल तर दुसरे काय ? या चर्चेतच वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘यूपीए’च्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. एनडीए किंवा यूपीए या आघाडय़ा अनेक पक्षांच्या एकत्र येण्याने उभ्या राहिल्या. ज्यांना दिल्लीतील सध्याची राजकीय व्यवस्था खरोखर नको आहे, त्यांनी ‘यूपीए’चे मजबुतीकरण हेच लक्ष्य ठेवले पाहिजे असे शिवसेनेनं म्हंटल आहे.

Leave a Comment