पैठण । प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील शिवसैनिकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आज दिसून आले. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आणि नंतर आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करू या अटीवर शिवसैनिक शांत झाले आहेत.
शिवसेनेच्या गद्दारानां खासदार रावसाहेब दानवे खतपाणी घालत असल्याने शिवसैनिकांत दानवे विरुद्ध प्रचंड रोष दिसुन आला. शेवटी शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी आधी दानवे सोबत चर्चा आणि नंतर प्रचार अशी भुमिका घेतल्या नंतर शिवसैनिक गप्प झाले. लवकरच तालुक्यातील शिवसैनिकांची खासदार रावसाहेब दानवे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली जाईल. त्यानंतर दानवे याचा प्रचार करायचा का नाही. हे ठरवले जाईल असे पैठण बाजार समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.
रावसाहेब दानवे सत्तेच्या धुंदीत शिवसैनिकांवर अन्याय करतात आसा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून नेहमीच केला जातो. त्यांच्या अशाच कृतीमुळे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंच्या विरोधात बंड पुकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पैठणच्या शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.