टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र, त्यावेळी शिवसेनेचा हा प्रस्ताव काँग्रेसने धुडकावला होता असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी खुलासा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले त्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, “अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे”. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”