हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात आपण राजकारण कधी सोडतोय अस वाटू लागले. अस खळबळजनक विधान केले. तसेच त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करत महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंत व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळय़ात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. श्री. शरद पवार, श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकले तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले. गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता अस शिवसेनेने म्हंटल.
गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत. त्यांची अस्वस्थता अधूनमधून व्यक्त होत असते, पण त्यासाठी व्यासपीठ नागपूरचेच असते हे विशेष. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे! अस सामनातून म्हंटल गेलं.