हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली पण पक्षीय बलाबल पाहता भाजपने इतरांपेक्षा जास्त जागा जिंकल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर घणाघात केला आहे. जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा शाधला.
प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
महाविकास आघाडीला पालघर, नागपुरात, धुळे-नंदुरबारला चांगले यश मिळाले. धुळ्यात भाजपाला विजय मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापले गट राखले. काही नव्याने जिंकले. नंदुरबारला आदिवासी मतदारांनी भाजपाला धक्का दिला. नागपुरात काँग्रेसने आघाडी घेतली. असे चढउतार झाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे म्हणणे असे की, त्यांचा पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. ते खरेच आहे. भाजपाने २२ जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला संकोच वाटू नये,” असंही या लेखात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. भाजपने 22 जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे 105 आमदार निवडून आले, पण 105 आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे.असा टोला शिवसेनेने लगावला.