‘त्या’ ऑडिओ क्लिप मुळेच रामदास कदम यांचा पत्ता कट?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मुळेच त्यांचा पत्ता कट झाला आहे का अस विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्याशिवाय, सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर बोलणं टाळलं. ते म्हणाले, “रामदास कदम यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलंय. ते अनेक वर्षे आमदार होते, अनेक वर्षे मंत्री होते. विधान परिषदेत देखील त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलंय. ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही एकत्र काम करू अस म्हणत यावर अधिक बोलणं टाळलं.