हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनोने हाहाकार केला असतानाच कोरोना लसीच्या पुरवठ्या वरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. केंद्राने कमी लसी दिल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी लसीकरण थांबले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असं आजच्या अग्रलेखात म्हटलंय.
महाराष्ट्रात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणानं. भाजपाशासित राज्यांना जास्तीत जास्त लस साठा पुरवला गेला आहे. उत्तर प्रदेशला ४४ लाख डोस, मध्य प्रदेशला ३३ लाख डोस, गुजरातला १६ लाख, कर्नाटक २३ लाख, हरयाणा २४ लाख, झारखंड २० लाख आणि महाराष्ट्राच्या वाट्याला रडतखडत कसेबसे १७ लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व करोना संक्रमणाची तीव्रता सगळ्यात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात माणसे राहात नाहीत असे केंद्राला वाटते काय? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकांत असंतोष भडकवायचा असे तर कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावे ना?,” अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल
करोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘##’ आहेत त्यांना करोना होणारच. करोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील. महाराष्ट्रात व देशात करोना अनेक भल्याभल्यांना झाला. म्हणजे जे मेले ते मरायच्याच लायकीचे व ज्यांना करोना झाला ते ‘##’ ! भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. ‘मास्क’ वगैरे लावू नका, असे विचारही त्यांनी मांडले. आता देशाचे पंतप्रधान काय करणार? खरे तर आज प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय, छत्रपती शिवरायांनाही मास्क लावूनच सिंहासनावर बसावे लागले असते. करोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही.
पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. देशात कोविड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोविडसंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात, जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page