हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून केंद्र सरकारवर टिकेचा भडीमार केला आहे. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली मर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, मार्शल बोलावणे नवी गोष्ट नाही. पण, एखादी दंगल घडते आणि सैनिकांना प्राचारण करण्यात येते, तसे मार्शलना बोलावण्यात आले. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही उभे आहोत आणि फक्त बंदुकीच आणायचं शिल्लक होतं. आम्ही पुढे जाऊ नये म्हणून महिला कमांडोंना उभे करण्यात आले. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली नामर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
आमचे लोकं कधी वेलमध्ये जात नाही. पण आमचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी काल वेलमध्ये गेले. का गेले? कारण अनिल देसाई हे विमा कंपन्याचे कर्मचारी वर्गाचे नेते आहेत. विमा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे देसाई वेलमध्ये उतरले. हे बिल थांबवा सांगण्यासाठी. पण तुम्ही धक्काबुक्की करता? महिला कमांडोज आणता समोर. लाज वाटली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.