हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे अस म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
आमदार त्या झाडी झुडुपांतून सांगत आहेत, “आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठे शिवसेना सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो!” पण या बोलघेवडय़ांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले व मंत्री झाले. आता त्यांचे बोल काही असू द्यात. शरद पवारांना ते नेते मानतच होते व “पवारांसारखा नेता होणे नाही” असे गौरवोद्गार काढीत होते. मात्र आता त्यांना महाशक्तीच्या अजगरी विळख्याने गिळले व त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची झाडी झुडुपे, शिवसेना आवडेनाशी झाली. अस शिवसेनेने म्हंटल.
भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे. राज्यसभा, विधान परिषदा गद्दारांच्या मदतीने जिंकल्या, पण शेवटी लोकभावना तीव्र आहेत. शिवसेनेतून जे फुटले ते टिकले नाहीत. भुजबळांना शरद पवारांनी व राणेंना भाजपने आधार दिला नसता तर त्यांचे काय उरले असते? स्वतःचे सत्त्व आणि अस्तित्वच हे लोक गमावून बसले अस उदाहरण सामनातून देण्यात आले.
हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱया झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद ‘मरहाटी’ मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते!