हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला जर सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत मालक बदलत असतात. हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे. आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? असा खोचक सवालही शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विचारला आहे.
कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात काही तरुण पोरांनी अमली पदार्थाचे सेवन केले किंवा बाळगले. सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकार्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला. खानचा मुलगा आर्यन याच्यामुळं या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे. त्या प्रसिद्धीमुळं एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद व बेभान झाले. सुशांतसिंह चक्रवर्तीस तुरुंगात पाठवणारे हेच अधिकारी होते. रियाकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नव्हते. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करत होता हे खरे. हे पदार्थ देणाऱ्या घेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते. या चार हजारांची किंमत म्हणून रियाला महिनाभर तुरुंगात रहावे लागले,’ अशा शब्दांत शिवसेनेनं समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर 3500 किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत 25 हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळे प्रसिद्धी व कारवाईच्या बाबतीत 3500 किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे!
मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईनचे प्रकरण कधी आले व संपले ते कळलेच नाही, पण 1 ग्रॅम चरस प्रकरण सुरुच आहे व आर्यन खानसह काही मुले तुरुंगात आहेत. कायदेपंडित सांगतात, संपूर्ण प्रकरण व मूळ पुरावे पाहता हे प्रकरण जामीन मिळावा असेच आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणा. त्यांना योग्य ती शिक्षा करा. पुनः पुन्हा त्याच चिखलात ढकलू नका, असे आपला कायदा सांगतो, पण तसे घडल्याचे दिसत नाही असे शिवसेनेनं म्हंटल.
आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी मध्यस्थांमार्फत झाली. त्यातली मोठी म्हणजे 8 कोटी रुपये इतकी रक्कम अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होती. त्यातली काही रक्कम इकडे तिकडे कशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले. या प्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाला की त्यास बेपत्ता केले, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच या प्रकरणी ओरबाडून निघाला आहे.
आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?, असाही सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.