हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार असून देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने स्वबळाची भाषा वापरली जात आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम, पक्षप्रवेश असे काँग्रेसी सोहोळे पार पडले. त्यातील एका सोहोळ्यात प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तर त्याही पुढे जाऊन म्हणाले, ‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच करायचा आहे.’ चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसविले होते व फडणवीसांचे राज्य आले होते. त्यामुळे चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची बांधणी नव्या जोमाने करावीच लागेल अशा शब्दात शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाणांना लक्ष्य केले.
निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही. मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती तेव्हाही ‘शतप्रतिशत भाजपा’ हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे असा टोला देखील शिवसेनेने काँग्रेसला लगावला.