हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) गत झालेली दिसते असं म्हणत शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. तर दीपक केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा असून २०२४ नंतर ते सुद्धा तुरुंगात जातील अशी भविष्यवाणीही शिवसेनेने केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप- शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडण्याची शक्यता आहे.
सामना अग्रलेखातून नेमकं काय म्हंटल-
नागपूर ‘एनआयटी’ च्या 16 भूखंड व्यवहाराची भर पडली. हे 110 कोटींचे भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे यातील भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे व भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय! नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर श्री. फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत. आमदार महेश शिंदे म्हणताहेत, “आम्ही खोके घेतले.” मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे. सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ‘ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी त्यांची गत झालेली दिसते अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.
यावेळी शिवसेनेने दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर. या डोमकावळयाने संजय राऊतांच्या तुरुंगवासावर अज्ञानी भाष्य केले. त्यांनी श्री. राऊत यांची सुटका करताना न्यायालयाने दिलेले खरमरीत निकालपत्र एकदा भिंग लावून वाचायला हवे. केसरकरांच्या फुटीर गटात किमान 10-12 आमदार असे आहेत की, ते ईडी, सीबीआयच्या भयाने पळून गेले. तुरुंगात जावे लागेल या भीतीने त्यांनी पक्षांतरे केली. काय सांगावे, उद्या म्हणजे 2024 नंतर हे सगळे पुन्हा तुरुंगात नसतील कशावरून व त्यांच्या जोडीला हा सावंतवाडीचा डोमकावळाही असेल, अशी भविष्यवाणी सामनातून करण्यात आली आहे.