हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं होत. गुजराती राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं राज्यपालांनी म्हणल्यानांतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आपल्या सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? या मथळ्याखाली शिवसेनेने कोश्यारींवर निशाणा साधला आहे. तसेच मुंबईसाठी मराठी व मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे व श्री. कोश्यारी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी तो समजून घेतला पाहिजे असेही शिवसेनेनं म्हंटल.
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे”, असं शिवसेनेने म्हंटल.
मुंबईत मराठी माणसाचा ‘टक्का’ कमी झाला. मुंबईची आर्थिक सूत्रे मराठी माणसाकडे नसतीलही, पण ही मुंबई मराठी माणसानेच घडवली असे इतिहास सांगतो. मुंबईवर मराठय़ांचे राज्य कधीच नव्हते, असे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मुंबईवर मराठय़ांनी कधीच राज्य केले नाही, गुजरातने मात्र केलेले आहे असा संदर्भ आजही काही लोक देत असतात. तो खरा नाही. सत्य व इतिहास असा आहे की, मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे मुसलमान सुलतान होते, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली! असा आरोप सामनातून करण्यात आला.
गुजराती, पारशी, मराठी असा हा त्रिवेणी संगम मुंबईत महत्त्वाचा ठरतो. मुंबईत आलेला गुजराती समाज पुढे येथे दुधात साखर विरघळावी तसा विरघळून गेला. मुंबईचे अर्थकारण तो चालवतो हे खरे. म्हणून येथील श्रमिकांचे महत्त्व कमी होत नाही. गुजरात व महाराष्ट्र पूर्वी एकच राज्य होते. आज ती जुळी भावडे बनली आहेत. मग उगाच दुधात मिठाचा खडा का टाकायचा? गुजराती व मारवाडी। लोकांनी मुंबईत येऊन व्यापार केला व पैसा कमावला, टाटांपासून अंबानींपर्यंत सगळ्यांचे वास्तव्य मुंबईत आहे हेसुद्धा वैभवाचे लक्षण आहे. बडोद्याचा विकास सयाजीराव गायकवाड यांनी केला. इंदूरवर होळकर व ग्वाल्हेरवर शिंद्यांचा पगडा आहे. मुंबईचे अर्थकारण गुजराती-राजस्थानी लोकांच्या हाती असेल तर त्याोबत वाईट का वाटावे? असा सवाल सामनातून केला.
मुंबईचे सिने जगत है तेव्हा व आजही पंजाबी लोकांच्या नियंत्रणाखाली होते, पण लता मंगेशकरही तेजाने तळपत होत्याच. महाराष्ट्राच्या भूगोलावर मुंबई आहे व मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. पैशात तो कमी असेल आणि आता तर माराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो. मराठी माणसाचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय, कधीतरी यावरही बोला. पैसा मिळेल त्या मार्गाने मिळवायची संधी आज एकाच प्रांताला व समुदायाला मिळत आहे. त्यामुळे मुंबईचेच नव्हे तर इतर प्रांताचेही अर्थकारण
बिघडले! राज्यपाल कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे विषयावर पडदा पडला असला तरी मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील. ती कायमचीच थांबवायला हवीत! असे शिवसेनेने म्हंटल.