हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या महागाई वरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. केंद्र सरकार म्हणत की देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. पण त्या अर्थचक्रात गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे जगणे मंदावले असा टोला शिवसेनेने लगावला.
देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे व राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांत घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी महागाईसंदर्भात जी क्षेपणास्त्रे डागली आहेत, त्यामुळे सरकारची किल्लेबंदी ढासळून पडली आहे. इंधन दरवाढीने जनता त्रस्त असतानाच पुन्हा विनाअनुदानित गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला. कोटय़वधी लोकांच्या स्वयंपाकघरातील अर्थव्यवस्था त्यामुळे कोलमडली. घरगुती सिलिंडरची किंमत आता मुंबईसारख्या शहरात ८८४.५० रुपये होणार आहे. गेल्या आठवडाभरातली ही दुसरी वाढ आहे.
भारतीय जनता पार्टीने दहा वर्षांपूर्वी महागाईविरोधी आंदोलन केले. त्यात रिकामी सिलिंडर्स घेऊन हेमा मालिनी, स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी वगैरे महिला मंडळ रस्त्यावर उतरले होते. देशातील कोटय़वधी महिला महागाईने त्रस्त झालेल्या असताना भाजपचे हे आक्रमक महिला मंडळ आता कोठे बसले आहे?”, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
“राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीवर हल्ला चढवला आहे. ‘जीडीपी’तील वाढ म्हणजे विकास दरातील वाढ नव्हे, तर गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ (जीडीपी) आहे असे घाव गांधी यांनी घातले आहेत. सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे, पण आता या लुटमारीच्या विरोधात संपूर्ण देश एकत्र येत आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले आहे की, सरकारने गरीब-मध्यमवर्गीयांचे जगणेच नष्ट केले. यूपीएने सरकार सोडले तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ५५ टक्के इतके वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता तो आता ७१ रुपये झाला. म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात ३१ टक्के घट होऊनही त्याचा लाभ आपल्या जनतेला होऊ शकला नाही.
गॅसच्या किमतीतही २६ टक्के घट झाली आहे, पण येथेही जनतेला स्वयंपाकाचा गॅस महागच महाग करून ठेवला. डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ करून मोदी सरकारने 23 लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले. हे २३ लाख कोटी रुपये नक्की गेले कोठे, त्याचा हिशेब राहुल गांधी यांनी मागितला आहे,” असा उल्लेख आग्रलेखात आहे.
सरकारमध्ये सामील असलेले नितीशकुमार व त्यांचा ‘जदयु’ यांनी महागाईविरोधात आवाज उठवला. दरवाढ मागे घ्या असे ते अत्यंत क्षीण आवाजात सांगत आहेत. जेथे जनतेचा महागाईविरुद्धचा आक्रोश मोदी सरकारच्या कानामध्ये पोहोचत नाही, तेथे हा क्षीण आवाज कसा पोहोचणार? मोदी सरकारचे म्हणणे असे आहे की, देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. मात्र त्या गतिमान अर्थचक्रात गरीब, मध्यमवर्गीयांचे जगणे मंदावले आहे,” असा टोला शिवसेनेने केंद्राला लगावला.