शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात विविध राज्यांतील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करत काळे झेंडे शेतकऱ्यांनी दाखवले होते. त्यानंतर १३ शेतकऱ्यांवर राज्यातील भाजप सरकारने गुन्हे दाखल केले. यावरून शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि हरयाणाच्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खट्टर सरकारने सूडाने जी कारवाई केली आहे, ती संतापजनक आहे. शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे, असे म्हणावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

केंद्र सरकार आणि राज्यकर्त्या पक्षाच्या नेत्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा असा काही धसका घेतला आहे की, ते आता शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवू लागले आहेत. दिल्लीवर धडका देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याची सर्व सरकारी कारस्थाने शेतकऱ्यांच्या भक्कम एकजुटीने धुळीला मिळवली. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या राज्यकर्त्यांनी आता आंदोलक शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवून दडपशाही सुरू केली आहे”, असंही अग्रलेखात म्हटलंय.

“शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे, असेच म्हणावे लागेल”, असा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

देशातील शेतकरी मारेकरी आणि दंगलखोर असूच शकत नाही. तो अन्नदाता आहे, तो सोशिक आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा तमाम संकटांशी दोन हात करत वर्षानुवर्षे तो संघर्ष करतो आहे. आपल्या लाखो शेतकरी बांधवांनी आत्महत्या करूनही त्याने कधी हातात शस्त्र घेण्याचा विचार केला नाही. अडचणींचा डोंगर आणि कर्जाचा ताण असह्य झाला तेव्हा त्याने गळफास घेतला, विषप्राशन केले; पण त्याने कधी कोणाचा जीव घेतला नाही. शेतकऱ्यांनी ठरवले असतेच तर राज्यकर्त्यांना केव्हाच पळता भुई थोडी झाली असती”, असंही अग्रलेखात म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’