हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यातील विरोधकांकडून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला गेला होता. त्यावर गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे असे शिवसेनेनं म्हंटल आहे. महाराष्ट्रातील वातावरण उद्योग व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली असा टोलाही शिवसेनेनं लगावला.
एखादा फॉक्सकॉन जम्मू-कश्मीरात गेला असता तर तेथील राष्ट्रवादी जनतेच्या आनंदास पारावर उरला नसता. भरकटलेल्या तरुणांच्या हातास रोजगार मिळाला असता व बाजूच्या पाकड्यांनाही विकासाच्या माध्यमातून चोख उत्तर मिळाले असते. जसे गुजरात पाकिस्तान नाही तसे जम्मू-कश्मीरही पाकिस्तान नाही. पंतप्रधान, गृहमंत्री गुजरातचे म्हणून सर्व प्रकल्प, उद्योग गुजरातकडे वळवले जात आहे. त्यासाठी केंद्रातील एक अदृश्य यंत्रणा काम करीत आहे, असे भ्रमाचे वातावरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी बरे नाही असे शिवसेनेनं म्हंटल.
गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतीच कोठे? वाद निर्माण करून दुफळ्या निर्माण करणारे दुसरेच आहेत. महाराष्ट्रातील वातावरण उद्योग व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरु आहे. पुन्हा उद्योग व्यापाराची कत्तल करायला महाराष्ट्रावर ‘ईडी’च्या लुटारू फौजा सोडल्या आहेतच. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच असा टोला शिवसेनेनं लगावला.