पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर? सामनातून भाजपवर निशाणा

0
94
Narendra Modi Shivsena
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र पोलिसांनी राणे यांना चिपळून येथून ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री उशीराने न्यायालयाने राणे यांचा जामिन मंजूर केला. यानंतर आता सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर अशीच कारवाई झाली असती असं सामनात म्हटलं गेले आहे.

नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे! असं सामनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय? असे म्हणत सामनातून भिमा कोरेगावचा संदर्भ देण्यात आला आहे.

नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिडय़ा जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे असे म्हणत सामनामध्ये राणे यांचा उल्लेख भोकं पडलेला फुगा असे करण्यात आला आहे.

राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ”मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,” असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल. श्री. मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत. पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत अशा शब्दात राणेंवर निशाणा साधला आहे.

राणे या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून 20 वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱयांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत असे सामनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here