मुलायमसिंह यांना पुरस्कार, पण मोदी सरकार बाळासाहेबांना विसरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह याना मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर याना मात्र यंदाही भारतरत्न देण्यात आला नाही यावरून शिवसेनेनं सामनातून टीका केली आहे. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून मुलायमसिंह यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली हे महत्त्वाचे आहे असा टोलाही शिवसेनेनं लगावला.

श्री. मुलायमसिंग हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे, पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळया चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय ? असा सवाल सामनातून करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो अशी टीका शिवसेनेनं केली .

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा काय मोठा गाजावाजा केला! पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असं म्हणत सामनातून शिंदे गटावर सुद्धा निशाणा साधण्यात आला.