हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? फक्त चिखलफेकच केली. आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले. मात्र तुमचेही पाय ‘चिखला ‘चेच आहेत हे ‘गमक’ विसरू नका. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण योग्यवेळी तुम्हाला करून देईलच असा इशारा शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. म्हणजे भाषण ठोकले. लोकसभेत बोलताना जसा त्यांनी अदानीचा ‘अ’ देखील उच्चारला नाही तसेच त्यांनी राज्यसभेतही केले. काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरू घराणे, आधीच्या काँग्रेस सरकारांवरील टीका याभोवतीच त्यांचे भाषण फिरत राहिले. एके ठिकाणी ‘चिखल’ आणि ‘कमळ’ यांचा त्यांनी उल्लेख केला. ‘किचड उनके पास था, मेरे पास गुलाल ! जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल,’ असे पंतप्रधानांनी मोठय़ा शायराना अंदाजामध्ये सांगितले. ‘’तुम्ही तेवढा जास्त चिखल उडवाल, तेवढे कमळ अधिक फुलेल,’ असेही ते म्हणाले. त्यावरून सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवली. देशभरातील भक्तमंडळीही ‘वाह! मोदी’ म्हणून खुश झाली असतील, पण या ‘यमका’ पलीकडील ‘गमका’चे काय ?
चिखल आणि कमळ हे यमक जुळवायला, बोलायला, टाळय़ा मिळवायला ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या भाषणात गांधी-नेहरू घराणे, काँग्रेस पक्ष आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्याविषयी जे बोललात ते काय होते? तुमच्याजवळ गुलाल होता आणि तो तुम्ही उधळला अशी बढाई तुम्ही मारली खरी, परंतु तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच तुम्ही फेकला असं शिवसेनेनं म्हंटल.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायचे? गुरुवारच्या राज्यसभेतील भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी ‘नेहरू जर महान होते, तर त्यांच्या वारसांना नेहरू आडनाव लावण्यात लाज कसली?’ अशी टीका केली. तो ‘गुलाल’ होता असे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला म्हणायचे आहे का? अदानी प्रकरणावरील मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय विरोधकांची जी मुस्कटदाबी मागील सहा-सात वर्षांत होत आहे, इतर पक्षांना संपविण्याचे जे राक्षसी उद्योग केले जात आहेत तो तुमच्या हातात चिखल असल्याचाच पुरावा आहे. आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले. मात्र तुमचेही पाय त्याच चिखलाचेच आहात हे विसरू नका अशी टीका शिवसेनेने मोदींवर केली आहे.