वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! सामनातून बंडखोरांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. आपल्याकडे 40 पेक्ष्या जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला असून लवकरच ते आपला गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून बंडखोरांना इशारा दिला आहे. यापूर्वीचा बंडाचा इतिहास पाहता वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही.

मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे.

आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!