चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या मिंडाळा गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अशोक कामठे आणि यशोदा कामठे अशी मारहाण झालेल्या बहिण-भावाची नावं आहेत. आरोपींनी त्यांच्या 70 वर्षीय वयोवृद्ध आईलासुद्धा मारहाण केली आहे.
फिर्यादी असलेल्या आईचे नाव इंदिराबाई कामठे आहे. पीडित आणि सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळे मयुरी सडमाके हिची प्रकृती सतत बिघडते असा आरोप करत प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम आणि चंद्रकला आत्राम यांनी यशोदा, इंदिराबाई यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती.
तर अशोक याला बांबू आणि बॅटने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. याच जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून 7 लोकांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.