धक्कादायक! जमिनीच्या वादातून आईने केला मुलावर विळ्याने हल्ला; बहिणीनेही केली कोयत्याने मारहाण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 
जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना तासगाव तालुक्यातील वायफळे येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून आईने आपल्या मुलावर विळ्याने हल्ला केला. तर याच वादात बहिणीनेही आपल्या आईची साथ देत आपल्या भावावर कोयत्याने वार केला. वायफळे येथील अरविंद विष्णू नलवडे यांच्यावर जमिनीच्या वादातून कोयता आणि विळ्याच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आला. आई सुमन विष्णू नलवडे व बहिण कविता सुधाकर भोसले यांनी हा हल्ला केल्याची फिर्याद अरविंद यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी दोघींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी अरविंद यांची सिद्धेवाडी हद्दीत वडिलोपार्जित जमिन आहे. या जमिनीतील वाटणीवरुन गेल्या पाच वर्षापासून अरविंद त्यांची आई व तीन बहिणींमध्ये वाद आहेत. गेल्या पाच वर्षात या जमिनीवरुन सर्वांमध्ये वारंवार वादावादीचे प्रसंग घडले आहेत. दरम्यान, अरविंद यांची मळणगाव येथील कविता भोसले ही बहिण त्यांच्या घरगुती वादामुळे गेल्या दीड महिन्यांपासून आईजवळ रहायला आहे. रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान अरविंद आपल्या सिद्धेवाडी हद्दीतील शेतातील घरात गेल्यानंतर त्यांची आई व बहिणीने वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तू येथे का आला आहेस, तुझा येथे हिस्सा नाही’, असे म्हणत शिविगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी बहिण कविता यांनी घरातील कोयता घेऊन अरविंद यांच्या डाव्या हाताच्या करंगळीजवळ मारला. तर आईने विळा घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आईने केलेला वार अडवताना तो उजव्या हाताच्या अंगठ्यास लागला.
त्यानंतर अरविंद यांनी सावळज औट पोस्ट पोलीस ठाण्यात धाव घेतली. सावळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. त्यामुळे शुक्रवारी अरविंद यांनी आपली आई व मळणगाव येथील बहिणीच्या विरोधात खुनी हल्ला केल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार माय – लेकींवर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”