औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर असल्याचे दिसले. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हानिहाय चर्चा करून सूचना केल्या होत्या. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात सुधारणा दिसून येत आहे. परंतु इतर जिल्ह्यांत काहीही परिणाम दिसून येत नसल्यामुळे आयुक्तांनी नोटिसा बजावल्या. विभागात आतापर्यंत 64.38 टक्के पहिला डोस, तर दोन्ही डोसची टक्केवारी 27.37 एवढीच आहे. त्यामुळे काल विभागीय आयुक्तालयातील आढावा बैठकीत आठ जिल्हाधिकारी, सीईओंना लसीकरण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
मराठवाड्यात 1 कोटी 56 लाख 26 हजार 300 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत 14 जानेवारी ते 22 नोव्हेंबर या दहा महिन्यांत 64.38 टक्के जणांनीच पहिला डोस घेतला आहे, तर दोन डोस घेणाऱ्यांची संख्या 27.37 टक्के एवढीच आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे विजय राठोड, परभणीच्या आंचल गोयल, हिंगोलीचे जितेंद्र पापळकर, नांदेडचे बिपीन इटनकर, बीडचे राधाविनोद शर्मा, उस्मानाबादचे कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांंच्यासह उपायुक्त पराग सोमण, जगदीश मणियार, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती.
काय दिले निर्देश ?
मराठवाड्यात बीड, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांत पहिल्या डोसचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर दुसरा डोसमध्येही नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची कामगिरी सर्वात कमी आहे. नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड या चारही जिल्ह्यांनी दैनंदिन लसीकरणाच्या प्रमाणात दुपटीने वाढ करावी. शिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सध्या दररोज 1 लाख 54 हजार 785 डोस दिले जात आहेत. हे प्रमाण 2 लाखांवर आणण्याचे निर्देश विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले.