हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदार संघात भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकत असेल तर मी राजीनामा देण्याचीही माझी तयारी आहे, मला सत्तेची लालसा नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हंटल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कल्याण मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरेल. कोणाला तिकीट द्यायचं हे तेच ठरवतील. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह साहेब असतील किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असतील यांनी एका विचाराने ही युती केली आहे. या युतीच्या माध्यमातून आपण सरकार स्थापन केलं आणि सरकार चांगलं कामही करत आहे. असं असताना एका शुल्लक कारणावरून शिवसेनेला मदत करायची नाही अशी भूमिका भाजपने घेतली आणि कल्याणचा लोकसभा उमेदवार आमच्या मर्जीचा असेल अशी भूमिका भाजपने घेतली आहे, पण आम्हाला आवाहन देण्याचं काम या लोकांनी करू नये असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी १० महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जे केलं त्याचाही विचार भाजपच्या लोकांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं नसत तर काय परिणाम झाले असते याचा विचार त्यांनी करावा. गेल्या ९ वर्षांपासून कल्याणच्या लोकांनी मला निवडून दिले आहे. निधीच्या बाबतीत सुद्धा काही अडचण नाही. असं सगळं चांगलं काम चाललं असताना युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करू नये. २०२४ निवडणुकीत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वानी कोणताही स्वार्थ न ठेवता काम केलं पाहिजे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हंटल. माझ्या मनात कोणताही स्वार्थ नाही. उद्या मला कोणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा द्यायला सांगितला तर राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. मी राजीनामा देऊन पक्षाचे आणि युतीचे काम करायला तयार आहे. उद्या समजा कल्याण मतदारसंघासाठी पक्षाने नवीन उमेदवार दिला तर मी सुद्धा त्याच्यासाठी काम करून त्याला निवडून आणेन असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.