शुभमच्या प्रामाणिक कष्टाला मिळाले फळ; राज्यात कर निरीक्षक म्हणून पटकावला पहिला क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक युवक-युवतींना आपण सरकारी अधिकारी होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असते. त्यासाठी ते खूप कष्टही घेतात. ते पुढे कठीण अशा परीक्षांना सामोरे जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र,  त्याला काहीजण अपवाद ठरतात. बीडमधील एका तरुणाने मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर याने फक्त परीक्षेत यश मिळवले नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे. पाहूया त्याच्या कष्टाची यशोगाथा…

बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर याने नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. शुभमने 2020 मध्ये हि परीक्षा दिली होती. त्याच्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेत शुभमला 306 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह शुभमने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सलग चार पासून MPSC परिक्षेची तयारी

शुभमने कोणत्याही परिस्थितीत आपण अधिकारी व्हायचेच अशी जिद्द मनाशी केली होती. त्याने 2018 पासून एमपीएसी परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यासाठी दिवसरात्र अभ्यासही केला. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही, असे म्हणत त्याने आपला अभ्यास पुढे चालू ठेवला. आणि विक्रीकर निरीक्षक या पदासाठीची परीक्षा दिली. शुभमचे वडील प्रतापराव हे शासकीय निवृत्त कर्मचारी आहेत. वडीलांची शुभमने शासकीय नोकरदार व्हावे,अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी शुभमला मार्गदर्शन केले.

शिक्षणात पहिल्यापासून हुशार

शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे बीड येथील चंपावती माध्यमिक विद्यालय झाले. दहावीत शुभमने 94 टक्के गुण मिळवले. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार असलेल्या शुभमने शिक्षणाचा एक एक टप्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. शुभमने आपले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून पुणे जाणे पसंद केले. या ठिकाणी जाऊन त्याने इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतळे. या शिक्षणावर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची एक वर्ष नोकरी देखील केली.

पुढेही सुरु ठेवणार अभ्यास

शुभमला मिळालेल्या यशाबद्दल विश्वासच बसत नव्हता. शुभमला निकाल लागल्याचे त्याच्या मित्रांकडून माहिती मिळाली. निकाल तर लागला पण आपण राज्यात पहिला क्रमांक मिळाला यावर त्याचा विश्वासच बसला नाही. परंतु, गेल्या चार वर्षापासून प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि शुभमला त्याचे हे फळ मिळाले. इथून पुढेही अभ्यास सुरूच राहणार असल्याचेर शुभमने सांगितले.