एप्रिलपासून पुर्ण क्षमतेने धावणार स्मार्ट शहर बस

smart city bus 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महापालिकेच्या स्मार्ट बसवरही झाला आहे. माजी सैनिकांच्या मदतीने कशाबशा 100 पैकी 11 शहर बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र, आता प्रशासनाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून 360 चालक- वाहक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सीकडून निविदा मागविण्यात आल्या आहे.

लॉकडाउननंतर सुरू झालेली स्मार्ट सिटी बस एसटी महामंडळातील कर्मचारी संपामुळे पुन्हा अडचणीत सापडली. दरम्यान, हा संप लांबत चालल्याने प्रशासनाने माजी सैनिकांची नेमणूक करून बससेवा अंशतः सुरू केली. सध्या शहरात एकूण 100 बसपैकी फक्त 11 बस त्याही प्रमुख मार्गावर धावत आहेत. या बसद्वारे रोजच्या 111 फेऱ्या केल्या जात आहेत. दोन महिन्यांत या बसद्वारे दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून स्मार्ट बस व्यवस्थापनाच्या तिजोरीत सुमारे 18 लाख रुपयांची भर पडली आहे. मात्र, अजूनही अनेक महत्त्वाच्या मार्गावर बससेवा सुरू झाली नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

स्मार्ट सिटी बसचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी सांगितले की, महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी एजन्सी नियुक्त करून त्यामार्फत स्मार्ट सिटी 180 चालक व 180 वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा दाखल करण्याची 4 एप्रिल शेवटची तारीख आहे. 5 एप्रिलला निविदा उघडल्या जातील. त्यानंतर लगेच एजन्सी निश्‍चित करून त्यामार्फत स्मार्ट सिटी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असल्याचे बनसोड यांनी म्हटले आहे.

एसटी बरोबरचा करार येणार संपुष्टात –
सिटी बससेवेसाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधीचा 2018 मध्ये सामंजस्य करार झाला. तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती. मात्र, ती चार वर्षांतच बंद पडली. त्यामुळे महामंडळाकडून जानेवारी 2019 पासून शहर बससेवा सुरू केली. दरम्यान एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने सिटी बससेवा पुन्हा बंद झाली. त्यामुळे आता एसटी सोबतचा करार संपुष्टात आणण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.