महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम फडणवीसच करतायत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत पण महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे, परंतु त्यास बट्टा लागला आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. असा पलटवार शिवसेनेनं केला आहे.

काय म्हंटल सामना अग्रलेखात-

श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत सार्दुचरणी गेले व म्हणाले, “राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.” राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उदार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत.

विरोधी पक्षनेत्यांचे हे गुड गव्हर्नन्स नक्कीच नाही. विरोधी पक्षातले फुटकळ लोक प्रशासनातील अधिकाऱयांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून गव्हर्नन्सची प्रतिमा मलिन करतात तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय? शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याआधी विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले आले गुड गव्हर्नन्स? असा सवाल शिवसेनेनं केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीयनि घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? देवाच्या चरणी तरी खरे बोला! मुळात देशातील भाजपशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल असे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले.

सोमय्यांवरही साधला निशाणा

ज्यांच्या स्वतःवरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन, मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले. काय तर म्हणे, दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडणार आहोत. बरं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हे महाशय निघाले तर त्यांच्यासोबत आणि स्वागताला कोण? तर ‘ईडी’कडे ज्यांच्या ‘मनी लॉण्डरिंग’चे, 100 बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले व ज्यांना तुरुंगात टाका अशी मागणी केली त्याच नारायण राणे यांच्या मुलास बाजूला बसवून हे महाशय कोकणातील भ्रष्टाचार संपवायला निघाले. हा एक मानसिक घोटाळाच आहे व अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही असे सामनातून म्हंटल.