सांगली प्रतिनिधी । आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.
यावेळी बोलताना इराणी म्हणाल्या,’छत्रपतींच्या स्मारकासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने २००१ साली केवळ घोषणा केली. त्यापलीकडे काही केले नाही. छत्रपतींच्या स्मारकासाठी भाजपने जमीन दिली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदुमीलची जागा दिली. आघाडीने महाराष्ट्राला प्रगती करू दिली नाही. देशात ७० वर्षात काहीच झाले नाही असे दस्तुरखुद्द राहुल गांधीच म्हणाले होते. आमच्यासाठी केंद्रबिंदू आमची भारतमाता आहे तर त्यांच्यासाठी गांधी घराणे हेच केंद्रबिंदू आहे. आमच्या आणि त्यांच्या राजकारणात मोठा फरक आहे. आम्ही देशाचे तुकडे होतील याची कल्पना करूच शकत नाही. आम्ही मोठ्या धाडसाने ३७० कलम रद्द केले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक पाकिस्तानची भाषा करतात. मनभेद असलातरी चालेल पण राष्ट्रभेद असता कामा नये.’ विधानसभेला जातीधर्माच्या नावावर समाजाचे तुकडे करतात तसेच भांडणे लावली जातात अशांना धडा शिकवण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.
दरम्यान स्मृती इराणी यांनी सभेनंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या घरी जात त्यांची सदीच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांचे मार्गदर्शनही घेतले.