औरंगाबाद – शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई अशा प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण, या प्रश्नांना बगल देण्यासाठी भावनिक विषय पुढे आणले जातात. औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर काँग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘व्यर्थ न हो बलीदान’ या उपक्रमाअंतर्गत सोमवारी काँग्रेसतर्फे पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस स्वबळावर लढणार आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘संभाजीनगर’ नामकरणाची हीच योग्य वेळ आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर पत्रकारांनी विचारला असता पटोले यांनी सध्या जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहेतच, ते काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांनी बगल देण्यासाठीच भावनिक प्रश्न वारंवार समोर आणले जातात. शहराचे नाव बदलण्याने हे प्रश्न सुटणार असतील तरी काँग्रेसचा नाव बदलण्यास विरोध नाही, असे पटोले म्हणाले.
विमानतळाचे नामकरण का होत नाही?
औरंगाबादच्या विमानतळाला संभाजीराजेंचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर निर्णय का होत नाही? असा प्रश्न पटोले यांनी केला. आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ‘संभाजीनगर’ हा विषय जेव्हा मंत्रिमंडळासमोर येईल, तेव्हा पाहिले जाईल.