हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो. शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते. शेतीच्या कामात बैल प्रचंड मेहनत करतात. त्यामुळे शेतकऱ्याचे आपल्या बैलासोबत एक वेगळेच जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले असते.
बैल आणि शेतकऱ्याच्या प्रेमाचे उदाहरण द्यावे अशी एक घटना पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात बैलगाडी शर्यती खूप प्रसिद्ध आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये असणारे बैल हे खूप प्रसिद्ध असतात. त्यांची किंमत देखील लाखांमध्ये असते. हे बैल शर्यतीत धावून आपल्या मालकाला एक नावलौकिक मिळवून देत असतात. अशाच एका शेतकऱ्याला नावलौकिक मिळवून दिलेल्या बैलाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने त्या शेतकऱ्यावर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बैलाचे नाव संज्या होते. संज्याचा जन्म अहमदनगर मधील पठारवाडी येथे झाला होता. तो एक वर्षाचा असतानाच त्याला कांताराम पठारे यांनी विकत घेतले. संज्या १७ वर्षाचा होता. त्याने या १७ वर्षात पुणे जिल्ह्यातील खूप शर्यती गाजवल्या.
अनेक शर्यतीमध्ये तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यामुळे त्याचेच नाही तर मालक पठारे यांचे देखील नाव खूप प्रसिद्ध झाले. फुलगाव येथील शर्यतीत तर त्याने हिंदकेसरी हा मानाचा किताब पटकावला होता. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून पठारे यांचे नाव घरोघरी पोहचले. याच संज्याने आता जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे पठारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पठारे कुटुंबाने संज्याचे ऋण फेडत माणसाप्रमाणे निरोप देत दशक्रिया विधी केला. त्यांनी मुंडन करून दुखवटा देखील पाळला. २०१३ पासून बैलगाडी शर्यती बंद आहेत. अनेकांनी आपले बैल विकले होते पण पठारे यांनी तसे केले नाही. त्यांनी आपल्या या लाडक्या बैलाचे स्मारक बनविले आहे. मरकळ (ता.खेड) येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांनी त्याचे स्मारक उभे केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.