औरंगाबाद – महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय पक्षांमधील खलबतं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच आता मनपा निवडणुकीसाठी प्रथमच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दंड थोपटले आहेत. एसडीपीआय 20 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असा निर्णय या पक्षाने घेतला आहे.
महाराष्ट्रात एसडीपीआयचा ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत एकही सदस्य नाही. मात्र, औरंगाबाद शहर राज्यातील 15 महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. एसडीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 22 व 23 नोव्हेंबरला होत आहे. या बैठकीत मनपा निवडणुकीचा अजेंडा ठरणार आहे इच्छुकांच्या मुलाखती पक्षातर्फे सुरू आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण चेहऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
एसडीपीआय या पक्षाने मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वार्डात शाखा, क्रियाशील सदस्य नोंदणी वर भर दिला आहे. पक्षाचे शहरातून एकूण चार पदाधिकारी आहेत. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळावी, मनपा मध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत या दृष्टिकोनातून पक्षाची तयारी सुरू आहे.