पुणे प्रतिनिधी | कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं खबरदारी म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन केला. उद्यापासून या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अचानक केलेल्या लॉकडाऊनमूळे अनेक विद्यार्थी, मजूर वर्ग आणि कामगार आहे त्या ठिकाणी अडकून राहिला. परिणामी या सर्वांसमोर दोन वेळच्या जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या सर्वांसाठी आशेचा किरण ठरल्या काही संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते. पुण्यातील गांजवे चौक, नवीपेठ येथे सुरू करण्यात आलेल्या भोजन केंद्रामध्ये २१ मार्च रोजी
पहिल्या दिवशी केवळ ४० मुलांना दोन वेळेचे जेवण देण्यात आले. यानंतर दररोज हा लाभ घेणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत असून आता दररोज जेवणाच्या ११०० डब्यांच्या पार्सलचे वाटप केले जात आहे. हे जेवण पूर्ण लॉकडाऊन होईपर्यंत देण्यात येईल.
मोफत जेवण वाटप करण्यात पुण्यातील विविध सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवर मित्र मदत करत आहेत. स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे. या जेवणाचा लाभ लोकमान्य नगर, नवी पेठ व सदाशिव पेठेसह नारायण पेठेतील विद्यार्थी घेत आहेत.
विद्यार्थ्यांना संकटाच्या वेळी अन्न देण्यासाठी “कोणीही उपाशी राहू नका आम्ही आहोत” या एकाच टॅगलाईनखाली सर्व सामाजिक कार्यकर्ते व टीम कार्यरत आहे. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, बुलडाणाच्या अध्यक्ष पल्लवी कोंडार, सचिव धनराज खारोडे, इस्कॉन मंदिर कात्रज, विश्व हिंदू परिषदचे गिरीश येनपुरे, राजूभाऊ जाधव, बजरंग दलचे चेतन बोडखे, प्रा. हरीश टिंबोळे, प्रा. राहुल देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई सावंत, प्रहार रुग्णसेवक नयनभाऊ पुजारी, महिला दक्षता पोलीस कमिटीच्या आशाताई जाधव, अक्षय सावंत, समीर पटवेकर, मनपा शिक्षिका मनिषाताई भोसले यांनी शिवणे, पुणे येथील १२४ कुटुंबातील २०५ व्यक्तींना १८ एप्रिलपासून लॉकडाऊन संपेपर्यंत एकवेळ जेवण देण्याचा उपक्रम सुरु ठेवला आहे. तसेच काहींना अन्नधान्य किटही मोफत उपलब्ध करून दिलं आहे. याशिवाय दाते वस्ती, तळजाई पठार पायथा येथे २२ एप्रिल पासून लॉकडाऊन संपेपर्यंत ८५ कुटुंबातील २०० व्यक्तींना एकवेळ जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेश शिंदे हे दाते वस्ती येथे मदतकार्य पार पाडत आहेत.
वारजेमधील रामनगर परिसरात २९ एप्रिलपासून २०० लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथील काम आशाताई जाधव पाहत आहेत. दांगट-पाटील इस्टेटमधील १०० मजुरांच्या जेवणाची व्यवस्था २९ एप्रिल २०२० पासून सुरू झाली आहे. येथील सर्व व्यवस्था मनिषाताई भोसले आणि नयनभाऊ पुजारी हे बघतात. याच कालावधीत कर्वे नगर, मराठवाडा कॉलेज परिसरात ५०० लोकांच्या जेवणाची सर्व व्यवस्था नयनभाऊ पुजारी, विष्णू मोरे तसेच सर्व प्रहार कार्यकर्ते करत आहेत. पुण्यातील एकूण २४०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील याबाबत दक्षता घेतली जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. जेवणाची मागणी अधिक वाढत आहे. संस्थेच्या वतीने स्वयंसेवक म्हणून रुपाली डामसे, मीना चौधरी मॅडम तसेच मनस्विनी पाटणे मॅडम या स्वखर्चाने विविध ठिकाणी जाऊन कोरोना रोगाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करत आहेत. एकूणच काय या संकटकालीन परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने आपल्या अवतीभोवती सहकार्य भावना ठेवून महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या देशावरील संकट दूर करण्यास एकमेकांस मदत करावी. असे आव्हान संस्थेने केले आहे.
या टीमला सहकार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी धनराज पाटील – 7057391005, 8888066022 किंवा प्रा. हरीश तिंबोळे – 9975398694 यांना संपर्क करावा.