सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
फडणवीस सरकारने बारामतीला उद्योगधंद्यासाठी जाणारे अतिरिक्त पाणी बंद करून ते सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ठाकरे सरकारने ते पाणी पुन्हा बारामतीला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्याचा निषेधही आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
राज्यात कोणत्या प्रकारची विकासकामे होत नाहीत. राज्य फक्त ठाकरे, पवार या घराण्यांचाच विकास होत असल्याची टीकाही भाजपच्या नेत्यांनी यावेळी केली. “तीन तिघाडा, काम बिघाडा’ अशी स्थिती या सरकारची झाली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे हे ठाकरे सरकार आहे असं म्हणत निषेध व्यक्त करण्यात आला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.