मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील साकीनाका येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. हे प्रकरण ताजे असताना महिलेवर क्रूरतेचा कळस गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरात एका जावयानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण
हत्या करणारा आरोपी तरुण हा विलेपार्ले परीसरातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. या दरम्यान त्याच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्याचं त्याला समजलं. एवढच नव्हे तर त्याच्या पत्नी दुसऱ्या नवऱ्यापासून गरोदर आहे, हे कळल्यावर त्याचा रागाचा पारा चढला. याच रागातून आरोपीनं थेट सासूची हत्या केली आहे. आरोपी जावई सासूच्या घरी गेल्यावर त्याचं सासूसोबत जोरदार भांडण झालं. बायकोचं दुसरं लग्न लावून दिल्याच्या रागात आरोपीनं सासूला मारहाण केली.
हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं दगड आणि चाकूनं सासूच्या गुप्तांगावर वार करत गुप्तांग दगडानं ठेचलं आणि आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असताना पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विलेपार्ले पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.