हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर असून त्यांच्या या मोहिमेला देशभरातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या बहरात जोडो यात्रा कर्नाटकात असून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकातील मंड्या येथे भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे काँग्रेसला कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नवचैतन्य मिळणार आहे.
एआयसीसीचे सरचिटणीस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. विजयादशमीच्या दिवशी सोनिया गांधी यांनी बेगूर गावातील भीमनाकोली मंदिरात प्रार्थना केली. गुरुवारी सकाळी त्या भारत जोडो यात्रेत सामील होतील. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे त्या यात्रेत सहभागी होऊन काही वेळेसाठीच पदयात्रा काढणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर सोनिया गांधी पक्षाच्या कुठल्यातरी जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा सोनिया गांधी देशात नव्हत्या. भारत जोडो यात्रेच्या प्रारंभी सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात गेल्या होत्या. आता मायदेशी आल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत.