हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. पंरतु काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या पत्रावर स्पष्टीकरण दिल आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद आहे असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे. सामान्य माणूस हा आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकारने अधिक लक्ष द्यावं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सरकारवर नाराजीचा प्रश्नच येत नाही, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
यात काही चूक नाही – छगन भुजबळ
राज्यातील मागासवर्ग, गरीब आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देणं ही काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सोनिया गांधी या मुख्यमंत्र्यांशी बोलल्या असतील तर त्यात काही चूक आहे, असं वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांना काही सूचनाही करत असतात.
हे पत्र म्हणजे दबावतंत्र नाहीच – संजय राऊत
सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’