नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या संचालक मंडळावरून पायउतार झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती गोएंका यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या लखनौ फ्रँचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावल्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष उद्भवू शकतो. हा वाद वाढत गेल्याने गांगुलीने आधीच मोहन बागान संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
2014 मध्ये ISL सुरू झाल्यापासून गांगुली ऍटलेटिको-कोलकाताचा भाग होता. क्लबचे नंतर एटीके (आमार तोमार कोलकाता) असे नामकरण करण्यात आले आणि नंतर मोहन बागान या दिग्गज क्लबमध्ये विलीन झाले. गोयंकाच्या RP-SG ग्रुपने सोमवारी IPL चा लखनौ संघ तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतला.
ICC च्या एका वरिष्ठ सूत्राने गुरुवारी सांगितले, “होय, सौरव गांगुलीने आधीच एटीके मोहन बागान व्यवस्थापनाला पत्र पाठवून कळवले आहे की तो क्लबच्या संचालक मंडळाचा भाग होऊ शकणार नाही.” याचे कारण म्हणजे RP-SG ग्रुप आता IPL संघाचा मालक आहे. त्यामुळे हे हितसंबंधांच्या संघर्षाचे प्रकरण असू शकते.
“IPL ची बोली पूर्ण झाल्यानंतर ही एक औपचारिकता होती आणि गांगुलीने आवश्यक काम केले,” असे सूत्राने सांगितले. RP-SG ग्रुपची बोली यशस्वी होईपर्यंत हितसंबंधांचा संघर्ष नव्हता कारण ते IPL चा भाग नव्हते. गोयंका म्हणाले होते, ‘मला वाटते की तो (एटीके) मोहन बागानमधून पूर्णपणे बाहेर पडेल. सौरवला याबद्दल फक्त घोषणा करायची आहे. मला म्हणायचे आहे, सॉरी. मला वाटते मी घाई केली.”