दाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. करोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ध्रुव सर्जा आणि त्याच्या पत्नीवर बंगळुरु येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“माझ्या पत्नीला आणि मला करोनाची लागण झाली आहे. आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या आम्ही दोघंही रुग्णालयात अॅडमिट आहोत. मला खात्री आहे आम्ही दोघंही बरे होऊन लवकरच परत येऊ. जे कोणी आमच्या संपर्कात आले होते, त्या सगळ्यांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या आणि काळजी घ्या”, असं ट्विट ध्रुव सर्जाने केलं आहे.

दरम्यान, ध्रुव आणि प्रेरणाप्रमाणेच दाक्षिणात्य अभिनेत्री सुमनलता यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. ध्रुव सर्जा हा लोकप्रिय कन्नड अभिनेता असून त्याचं मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रेरणा शंकरसोबत लग्न झालं आहे. ध्रुव हा चिरंजीवी सर्जा यांचा धाकटा भाऊ असून चिरंजीवी यांचं ७ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.