सातारा | जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस विभाग व इतर विभागांच्या समन्वयातून 1 मे ते 31 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी श्री. बंसल बोलत होते. या बैठकीला केंद्रीय वस्तु व सेवा कर विभागाचे अधीक्षक महेश व्हटकर, औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्रीकांत खरात, वैद्यकीय अधिकारी उत्कर्षा साळुंखे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पार्सल सुविधेतून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत लक्ष ठेवण्यात यावे. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तिंची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याची माहिती प्राप्त करुन घ्यावी. एन.डी.पी.एस अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांवर कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जे कारखाने बंद आहेत. त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांनी केल्या.