Saturday, June 3, 2023

एसटी बसने विद्यार्थ्याला चिरडले; बस चालकाचा पोबारा

परभणी प्रतिनिधी । परभणी जिल्हयातील कौसडी बोरी रस्त्यावरील आरब्बी मदरस्याजवळ जिंतूर कडून परभणीला जात असलेल्या बसने एका शाळकरी मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला आहे. ही घटना घडल्यावर मात्र या बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत बसमधील नागरिकांना कुठलीही हानी पोहचली नाही.

या अपघातात मृत पावलेला मुलगा हा जिल्ह्यातील कौसडी गावचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा शाळकरी मुलगा सायकलवरून शाळेत जात होता. तेव्हा मागून येणाऱ्या एसटी बसने या मुलाला धडक दिली. या धडकेत मुलगा बस खाली चिरडला गेल्याचे लक्षात येताच बस चालकाने  पोबारा केला आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. तसेच या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.